पुणे- भरधाव वेगात जाणाऱ्या रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुणे – सोलापूर महामार्गावर केडगावच्या हद्दीत रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडला.
शेटीबा वडजी मुधोळकर (वय ७०) आणि देवानंद सुरेश मुधोळकर (वय १७ दोघेही राहणार १२ नं पाटी, मांजर, ता. रेणापूर, जि. लातूर ) अशी अपघातात मृत्यू झालेल्या आजोबा नातवाची नावे आहेत. रुग्णवाहिका चालक ओंकार अनंत कणसे (रा. ता. रेणापूर, जि. लातूर) जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका चालक ओंकार कणसे याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या रुग्णवाहिनीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली. या प्रकरणी सचिन मुधोळकर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून रुग्णवाहिका चालकाच्या विरोधात निष्काळजीपणाने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज करीत आहेत.
