पिंपरी- वैद्यकीय पदवी किंवा पात्रता नसतानाही रुग्णांची तपासणी करून औषधे व इंजेक्शन देणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर रावेत पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई १६ ऑगस्ट रोजी रात्री पांढरे वस्ती, पुनावळे येथील श्रीनाथ हॉस्पिटलजवळ करण्यात आली.
भागवत टेटुराम निषाद (वय ३९) असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत टेटुराम निषाद हा वैद्यकीय पात्रता किंवा पदवी नसतानाही रुग्णांची तपासणी करून औषधे व इंजेक्शन देऊन उपचार करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून खातरजमा केली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली.
निषाद याच्याविरुद्ध बीएनएस कलम ३१८(४), ३१९(२) तसेच वैद्यकीय व्यवसायी अधिनियम १९६१ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार करीत आहेत.
