पुणे- डेक्कन जिमखाना परिसरातील फ्लाईंग जिप्सी हॉटेलमध्ये झालेल्या राड्यानंतर याच हॉटेलसमोर एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याचे प्रकरण मागील आठवड्यात घडले होते. आता या प्रकरणी रीलस्टार माधवी कुंभारसहित आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
सोशल मीडियावरील रिल्सला लाईक आणि कमेंट्स करण्याच्या क्षुल्लक कारणावरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने डेक्कन परिसरातील ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये धुमाकूळ घातल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर लगेच या हॉटेलच्या बाहेर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व जगताप याच्यावर कोयत्याने हल्ला झाल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये दोन तरुणींचा सहभाग असल्याचे समोर आले होते.
आता या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी रीलस्टार माधवी कुंभार, स्नेहल सोनके (रा. पिंपळे गुरव) आणि शार्दुल ओव्हाळ (रा. हडपसर) यांना अटक केली आहे. अथर्व जगताप याच्या डेक्कन पोलीस ठाण्यातील फिर्यादीनुसार आरोपी तरुणी, फिर्यादी अथर्व जगताप हे ओळखीचे आहेत. सातारा येथे कास पठारावर त्यांची आपसात काही महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. शनिवारी (15 ऑगस्ट) पहाटे सव्वातीनला अथर्व हा फ्लाईंग जिप्सी हॉटेलमधून बाहेर पडत असताना टोळक्याने अडवलं होतं.
‘अरे तू, पोरींना काय बोलला. आमच्याबरोबर चल, तुला दाखवितो’ अशी धमकी दिली. अथर्व घाबरून हॉटेलमध्ये पळाला. त्यावेळी आरोपी तरुणी आणि साथीदारांनी त्याला शिवीगाळ केली. याला मारा, जिवंत सोडू नका, असं धमकावत शस्त्राने वार केला. तर हॉटेलमध्ये घुसून त्याला खुर्चीने मारहाण केली. तर लाथाबुक्क्यांनी तुडवलं होतं.
