ब्रेकिंग न्यूज

लोणावळा रेल्वे स्थानकातील पाणी पिताय का ? सावधान ! देशातील ८ रेल्वे स्थानकातील पाणी आरोग्यास हानिकारक

Share

नवी दिल्ली- मुंबईसह देशातील अनेक प्रमुख रेल्वे स्थानकांवरील पिण्याचे पाणी दूषित आणि आरोग्यास हानिकारक असल्याचे समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या स्थानकासहित देशातील ८ रेल्वे स्थानकातील पाणी आरोग्यास हानिकारक असल्याचा अहवाल भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) ने दिला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांमधील भेसळ समोर येत असताना रेल्वे स्थानकांवरील पाण्याच्या शुद्धतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पॅसेंजर ऍमिनिटीज अँड सॅनिटेशन या शीर्षकाखाली सादर केलेल्या अहवालात देशातील अंक प्रमुख रेल्वे स्थानकांवरील ‘वाटर कूलर’ आणि नळांच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये मानवी विष्ठेमध्ये आढळणारे ‘ई-कोलाय’ (E. Coli) आणि ‘टोटल कोलीफॉर्म’ सारखे धोकादायक जिवाणू आढळले आहेत, ज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दक्षिण रेल्वेच्या कोइम्बतूर आणि पलक्कड जंक्शन, दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद, पूर्व रेल्वेच्या माधवपूर या स्थानकांवरील कूलरमधील पाण्याच्या नमुन्यांत ई-कोलाय आढळला.

रेल्वे बोर्डाने स्थानकांवर प्रवासी सुविधा पुरवण्याबाबत विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. प्रवासी सुविधा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांतून अपेक्षित लाभ मिळाले आहेत की नाही, याचे मूल्यांकन करण्यासाठी हे लेखापरीक्षण करण्यात आले, असे कॅगकडून सांगण्यात आले. अहवालानुसार २०३५ स्थानकांवर पिण्याच्या पाण्याच्या नळांची, ४०३ स्थानकांवर मुतारीची, २०१ स्थानकांवर शौचालयांची संख्या ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा कमी आहे. तपासणी केलेल्या ५१२ बिगर-उपनगरीय स्थानकांपैकी ४५८ स्थानकांवर (८९टक्के) पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि बसण्याची योग्य व्यवस्था यांसारख्या किमान आवश्यक सुविधांमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्या.

रेल्वे बोर्डाने स्थानकांवर प्रवासी सुविधा पुरवण्याबाबत विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. कॅगच्या ताज्या अहवालातून या सर्व मार्गदर्शक तत्वांची पोलखोल झाली आहे.