पुणे – पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे दरडी कोसळल्याने आणि छोटा साकव वाहून गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला ताम्हिणी घाट पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात ताम्हिणी घाटातील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक गर्दी करतात. मार्ग बंद असल्याने स्थानिक पर्यटनावर आधारित छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला होता.
आता पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्गावरून पुन्हा वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, वाहचालकांना यासोबत काही अटी आणि नियम पाळावे लागणार आहेत.
सध्यातरी या मार्गावरून केवळ दुचाकी, कार, हलकी वाहने आणि एसटी बसेसना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचे काम अजूनही युद्धपातळीवर सुरू असल्याने अवजड वाहतुकीवर पूर्ण बंदी कायम असेल. तसंच घाटातून प्रवास करताना सर्व हलक्या वाहनांना ताशी २० किमी या वेगमर्यादेचे काटेकोर पालन करावे लागेल.
