मुंबई – एकाच चार मृतदेह आढळून आल्याच्या घटनेने मुंबई हादरून गेली आहे. कुलाबा येथील ‘नेव्ही नगर’ परिसरात नौदलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह दोन निष्पाप बालकांसह जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या दुर्दैवी घटनेत दोन महिन्यांच्या चिमुकल्या बाळाचा आणि तीन वर्षांच्या मुलाचाही समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नौदल कर्मचाऱ्याच्या राहत्या घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने संशय आला आणि त्यानंतर या भीषण प्रकाराचा उलगडा झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
नौदल कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर त्याच्या पत्नीचा आणि दोन्ही निष्पाप मुलांचा मृत्यू विषप्राशनामुळे झाला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. चौघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन ते उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, पतीनेच आधी पत्नी आणि मुलांना विष देऊन नंतर स्वतः गळफास घेतला का? याबाबत पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण कळू शकणार आहे.
