मुंबई- वाढदिवसासाठी आणलेला केक खाल्यानंतर सात ते आठ जणांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना नालासोपारा येथील नीलकंठेश्वर बिल्डिंगमध्ये उघडकीस आली आहे. या केकमध्ये मृत पाल सापडल्याचा दावा करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
उर्मिला वर्मा (32), सलोनी गुप्ता (16), सुदीक्षा शाह (19), आफिया इद्रिस (24), रुबी शाह (40), शिव गुप्ता (10), प्रियांश वर्मा (2), परी यादव (7), प्रिया वर्मा (8), रुद्र शाह (13) आणि प्राची यादव (8) अशी उपचार सुरु असलेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी नालासोपारा येथील विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील नीलकंठेश्वर बिल्डिंगमध्ये एका मुलीच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी समोर असलेल्या चामुंडा डेअरी (Chamunda Dairy) येथील केक शॉपमधून केक खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना उपस्थितांनी केक खाण्यास सुरुवात केली. मात्र, केक खात असतानाच त्यामध्ये मृत पाल आढळल्याचा दावा करण्यात आला. केकमध्ये पाल दिसताच उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, हा केक खाल्लेल्या काही जणांची त्यानंतर प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी नालासोपारा येथील विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर केक नेमका कोणत्या परिस्थितीत तयार करण्यात आला? तो तयार करताना किंवा पॅकिंग करताना स्वच्छतेची योग्य काळजी घेण्यात आली होती का? केकमध्ये पाल कशी आली? तसेच संबंधित दुकानातून विक्री करण्यात आलेल्या इतर खाद्यपदार्थांची स्थिती काय आहे, या घटनेनंतर एफडीए कारवाई करणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
