ब्रेकिंग न्यूज

महिलेच्या मोबाईलवर मेसेज केला आणि जीव गेला, पुण्यातून इसमाचे अपहरण करत सांगलीत निर्घृण हत्या

Share

सांगली – नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज केल्याच्या किरकोळ कारणावरून एकाला आपला जीव गमवावा लागला. तीन तरुणांनी त्यांचे पुण्यातून अपहरण करून सांगलीला नेऊन त्यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगली शहर पोलिसांना मिळालेल्या एका छोट्याशा ‘क्ल्यू’मुळे या भयंकर गुन्ह्याचा अवघ्या पाच दिवसांत उलगडा झाला आहे.

गोविंद माधवराव उपासे (वय 59, रा. तपोधाम सोसायटी गल्ली नं. 1, वारजे, माळवाडी, पुणे) असे या दुर्दैवी घटनेत बळी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी सांगली पोलिसांनी

वैभव ऊर्फ तातोबा केंगार (वय 28, मूळ रा. बेळुंकी, ता. जत, सध्या रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे), रोहन जयसिंग सावंत (वय 23, रा. येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) आणि राहुल राजेंद्र बाबर (वय 25, रा. बेळुंकी, सध्या रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) या तीन तरुणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेला मोबाईलवरून मेसेज पाठवल्याचा राग मनात धरून वरील तीन तरुणांनी गोविंद उपासे यांना पुणे मधील आंबेगाव बुद्रुक भागातून भरदिवसा अपहरण केले. उपासे घरी ण आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दुसरीकडे, अपहरणकर्त्यानी उपासे यांना थेट सांगली शहरातील शामरावनगर परिसरातील एका निर्मनुष्य आणि एकांत गोठ्यात आणून ठेवले. तिथे त्यांना अत्यंत अमानुष मारहाण करण्यात आली.

क्रूरपणे मारहाण केल्यानंतर, तिन्ही आरोपी त्यांना पुन्हा पुण्यात नेऊन सोडण्यासाठी गाडीतून निघाले असताना गंभीर दुखापती आणि अंतर्गत रक्तस्रावामुळे प्रवासादरम्यानच उपासे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उपासे यांच्या मृत्यूमुळे आरोपीनी कडेगाव ते कराड दरम्यान जाणाऱ्या टेंभू योजनेच्या कॅनॉलमध्ये उपासे यांचा मृतदेह अत्यंत थंड डोक्याने फेकून दिला.

केवळ एका गोपनीय माहितीमुळे या संपूर्ण गुन्ह्याचा पर्दाफाश शक्य झाला. सांगली शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निष्णात कर्मचारी गौतम कांबळे आणि संतोष गळवे यांना शामरावनगर मध्ये एका अनोळखी व्यक्तीला डांबून ठेवून मारहाण झाल्याची कुजबुज आणि गोपनीय माहिती मिळाली. या छोट्याशा माहितीचा धागा पकडून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्र वेगाने फिरवली. पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने अत्यंत वेगाने आणि गुप्तपणे तपास करत तिन्ही आरोपीना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच या तिघांनीही या हत्येची कबुली दिली.

हा गुन्हा पुणे येथील आंबेगाव पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, तिन्ही आरोपींना शुक्रवारी रात्री आंबेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण पुणे आणि सांगली परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.