ब्रेकिंग न्यूज

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्या प्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Share

लोणंद – मागील आठवड्यात आळंदीमध्ये विवाह लावून दिल्याप्रकरणी मंगल कार्यालयाच्या संचालकांसह नातेवाइकांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे प्रकरण ताजे असतानाच फलटण तालुक्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. फलटण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर दि. १४ ऑगस्ट रोजी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिची प्रसूती झाली असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ सप्टेंबर २०२५ ते १४ ऑगस्ट २०२६ हा प्रकार घडला. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्या इच्छेविरुद्ध तिचा विवाह लावून देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर नवऱ्यामुलानेही ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्याशी वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली.

दि. १४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.१० वाजता सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिची सिझेरियनद्वारे प्रसूती झाली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी व एमएलसी जबाबाच्या आधारे पोलिसांनी पाचजणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियमातील कलम 9, 11 तसेच पोक्सो अधिनियमातील कलम 4, 6, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच फलटण विभागाचे उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी रात्री १०.१६ वाजता घटनास्थळी भेट दिली. लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हेगडे तपास करीत आहेत.