ब्रेकिंग न्यूज

सराफ व्यापार्‍यांचे 90 लाखांचे सोन्याच्या दागिन्यांचे पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय गायब

Share

पुणे – सराफ व्यापार्‍यांचे सोन्या चांदीचे ९० लाख रुपयांचे दागिने असलेले १४ पार्सल घेऊन कुरियर बॉय पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईला जाणार्‍या डिलिव्हरी बॉयने पार्सल मुंबईत पोहचविण्याऐवजी ते दागिने घेऊन तो पळून गेला. ही घटना ५ ऑगस्ट २०२६ रोजी साडेपाच वाजता घडली.

याबाबत जितेंद्र ऋषिकेश सिंह (रा. लक्ष्मी अपार्टमेंट, राष्ट्रभूषण चौक, घोरपडी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विशाल सत्यपाल चौहान (वय २०, रा. मुंबई, मुळ रा. नरोरा, जि. इटाह, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र सिंह यांचा एस जी एल जे पी लॉजिस्टिक प्रा. लि. या नावाने कुरिअरचा व्यवसाय आहे. ते ग्राहकांचे सोने व पैसे कुरिअरने पाठविण्याचे काम करतात. महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर येथे त्यांची कार्यालये आहेत. प्रत्येक कार्यालयामध्ये काम करण्यास मुले ठेवली आहेत.

पुणे येथील कार्यालयात रजनिश शर्मा हा कामास असून मुंबई कार्यालयात विशाल चौहान नोकरीला आहे. त्याला दरमहा १२ हजार ३०० रुपये पगार दिला जातो. ४ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील ६ सराफ, पुण्यातील ५ सराफ, जळगाव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रत्येकी एक असे एकूण ९० लाख ३३ हजार रुपयांची १४ सोन्याची बिस्किटे, दागिने यांची पार्सल होती. हे पार्सल घेऊन विशाल चौहान याला ५ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता रजनिश शर्मा याने स्वारगेट एस टी बसस्थानकावर सोडले.

तो मंत्रालयच्या बसने मुंबईला गेला. बस ९ वाजता मुंबईला पोहचली. पण, विशाल चौहान हा काही पोहचला नाही. त्याला फोन केल्यावर त्याचा फोन बंद लागत होता. फिर्यादी यांनी बस कंडक्टरला फोन केला असता तुमचा कामगार वाकड पुलाखाली उतरल्याचे समजले. त्यांच्या कार्यालयातील रजनिश शर्मा याने विशाल चौहानचा दोन दिवस शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा थांगपत्ता लागू शकला नाही. अखेर फिर्यादी जितेंद्र सिंह यांनी खडक पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड तपास करीत आहेत.