छ. संभाजीनगर- कॉकरोच जनता पार्टी सप्टेंबर २०२६ पासून देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ ही नवीन मोठी मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेची अधिकृत घोषणा पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीनंतर केली.
या मोहिमेच्या माध्यमातून सीजेपी देशातील 5 मोठ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा हा सर्वात मुख्य मुद्दा असणार आहे.
पक्षाच्या विचारधारेबद्दल बोलताना अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले की, कॉकरोच जनता पार्टीची विचारधारा ही पूर्णपणे भारतीय संविधानावर आधारित आहे. सप्टेंबरपासून सुरू होणारी ‘क्या बोलती पब्लिक’ ही मोहीम म्हणजे एकप्रकारे संपूर्ण देशाचा दौरा असणार आहे. आज देशातील सर्वसामान्य जनतेचा आवाज ऐकण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने आणि नेत्यांनी लोकांचे म्हणणे ऐकले नाही, तर जनतेला थेट रस्त्यावर उतरावेच लागेल, असे दीपके यांनी सांगितले.
या मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये
ही मोहीम प्रामुख्याने शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा (वाढती फी कमी करणे), देशातील वाढती बेरोजगारी, न्यायव्यवस्था मजबूत करणे, संविधान आणि निवडणूक सुधारणा या ५ महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित असेल. सीजेपी ही कोणत्याही निवडणूक राजकारणात पडणार नाही, तर देशात सकारात्मक बदलासाठी एक स्वतंत्र ‘प्रेशर ग्रुप’ (दबाव गट) म्हणून काम करेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
