पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस दलातील वादग्रस्त प्रकरणामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता आणखीन एका प्रकरणामुळे पोलीस दलामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. तपासाच्या नावाखाली पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पुणे शहर पोलिस दलातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकसह तीन कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय बडगा उगारण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांच्या दोन वर्षांच्या वार्षिक वेतनवाढी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी रोखल्या आहेत.
पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी महिला पोलीस उपनिरीक्षक, एक हवालदार आणि महिला पोलीस शिपाई हे तिघे महिला फिर्यादीला सोबत घेऊन साताऱ्यात गेले होते.साताऱ्यात पोहोचल्यानंतर नियमानुसार स्थानिक पोलिसांना माहिती देणे गरजेचे होते. मात्र, पोलिसांनी साताऱ्याजवळी कास पठार पाहण्याचा आनंद घेतला. तिथून एका धाब्यावर मनसोक्त जेवणाचा आनंद घेऊन दुपारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. त्यानंतर नावालाच घटनास्थळाचा पंचनामा करून तेथील नागरिक किंवा प्रत्यक्षदर्शींकडे कोणतीही चौकशी न करताच हे पथक निघून गेले.
दरम्यान, सोबत आलेल्या महिला फिर्यादीने ‘माझी आई घरी आजारी असून लवकरात लवकर पुण्यात चला’ अशी विनंती केली. परंतु, तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून पर्यटनाचा आनंद घेऊन सर्वजण रात्री एक वाजण्याच्या सुमारास पुण्यात पोहोचले. स्वारगेट येथे फिर्यादी महिलेला सोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तिने विनंती केल्यावर संबंधित महिलेला शनिवार पेठ पोलीस चौकीजवळ सोडून दिले. मध्यरात्री एका महिलेला एकटे सोडणे धोक्याचे असतानाही पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका पोलिसांवर ठेवण्यात आला आहे.
या सर्व प्रकाराची चौकशी केल्यानंतर संबंधित महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत निष्काळजीपणा, बेशिस्त आणि हलगर्जीपणा दाखवल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे नमूद करत प्रशासनाने तिघांचीही पुढील दोन वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कडक शिक्षा सुनावली आहे.
