पुणे- सोशलमिडीयावरील मैत्री एका शिक्षिकेला खूपच महागात पडली. घरात पाहून म्हणून आलेल्या मित्राने शिक्षिकेच्या घरातील २४ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा १४ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
यश कैलास भुलचंदानी (वय २४, रा. मोहाडी, जि. मेहसाणा, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी पेशाने शिक्षिका असून अविवाहित आहे. सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी समाजमाध्यमातून तिची आरोपी यश याच्याशी ओळख झाली होती. यश हा २५ जूनला कोंढवा खुर्द येथील तरुणीच्या घरी भेटण्यासाठी आला होता. त्या वेळी तरुणी त्याच सोसायटीत राहणाऱ्या मावशीकडे जेवणाचा डबा देण्यासाठी गेली असताना घरात एकटाच असलेल्या यशने बेडरूममधील कपाट उघडून त्यातील २४ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून पळ काढला. घरातून निघताना ‘माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी निघतो,’ असे सांगून तो पसार झाला.
तरुणी घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. कोंढवा पोलिसांनी गुजरातमधील बडोदा येथून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून चोरीतील १४ लाख ३९ हजार रुपये किमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
यश याने MBA शिक्षण घेतले असून यापूर्वी केनियामध्ये नोकरी केली होती. सध्या तो पुण्यात आला असून, एका टुरिस्ट कंपनीत काम करत होता.
