कंपनीतून २९ हजारांची सोल्डर वायर चोरताना कामगार रंगेहाथ पकडला ; महाळुंगे एमआयडीसीत मधील घटना

कंपनीतून २९ हजारांची सोल्डर वायर चोरताना कामगार रंगेहाथ पकडला ; महाळुंगे एमआयडीसीत मधील घटना 
Share

पिंपरी – महाळुंगे एमआयडीसीत एका कंपनीतून विनापरवाना २९ हजार रुपये किमतीची सोल्डर वायरची आठ बंडले चोरून नेत असलेल्या कामगाराला सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून रंगेहाथ पकडले. फ्लॅश इलेक्ट्रॉनिक प्रा. लि. कंपनीत रविवारी (दि. ४) रोजी सकाळी ही घटना घडली.

या प्रकरणी विवेक खनेलाल पासवान (वय २४, सध्या रा. कडाचीवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. कुर्सा, पोस्ट पचोरी, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे आरोपी कामगाराचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. कंपनीतील अधिकारी आशिष रामचंद्र त्रिभुवन (वय ५४, व्यवसाय नोकरी, सध्या रा. बी-२०३, कृष्ण क्लासिक सोसायटी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विवेक पासवान हा संबंधित कंपनीत कामगार म्हणून कार्यरत आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्याने कंपनी व्यवस्थापनाची परवानगी न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सोल्डर वायरची आठ बंडले बॅगेत भरली. सुमारे २९ हजार रुपये किमतीचा हा माल घेऊन तो कंपनीबाहेरून निघून जात असताना कंपनीचे सुरक्षा रक्षक सूरज गुप्ता आणि मानव संसाधन विभागातील शुभम बनकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.

दोघांनी त्याचा पाठलाग करून चोरीच्या मालासह त्याला पकडले. आरोपीने यापूर्वीही कंपनीत अशाच प्रकारे चोरी केली असण्याची शक्यता असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Vedh News