धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मिळणार ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मिळणार ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
Share

मुंबई – कर्तव्य बजावताना साहसी कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ योजना जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वाकांक्षी योजनेला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलिसांचे मनोबल उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.

केद्राकडून दरवर्षी 26 जानेवारी व 15 ऑगस्ट रोजी शौर्य पदके दिली जातात. तसेच पश्चिम बंगाल, तमिळनाडू, तेलंगणा, केरळ या राज्यांमध्येही राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही हे विशेष शौर्य पदक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील गडचिरोली आणि गोंदिया हे जिल्हे नक्षलवाद प्रभावित भाग आहेत. याशिवाय माओवाद, दहशतवाद, जातीय दंगली, संघटित गुन्हेगारी, तस्करी आणि बाह्य हल्ल्यांपासून राज्याचे संरक्षण करण्याची अत्यंत कठीण जबाबदारी महाराष्ट्र पोलीस धैर्याने पार पाडत असतात. त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी राज्यस्तरावर हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

काय असेल पुरस्काराचे स्वरूप? 

• ५० हजार रुपये रोख रक्कम दिली जाईल.

• एक विशेष पदक दिले जाईल.

• एक प्रशस्तीपत्र दिले जाईल.

महत्त्वाच्या तरतुदी

• यावर्षी १ जानेवारी २०२६ पासून केलेल्या कामगिरीची दखल घेतली जाईल.

• हे पदक गरज पडल्यास मरणोत्तर सुद्धा दिले जाऊ शकते.

• दरवर्षी १ मे (महाराष्ट्र दिन) च्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा केली जाईल.

निवड प्रक्रिया

• जिल्हा आणि पोलीस आयुक्तालय स्तरावरून पात्र पोलिसांचे प्रस्ताव पाठवले जातील.

• पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रस्तावांची छाननी करेल.

• अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे सादर केले जातील.

– शौर्य पदकांची कोणतीही निश्चित किंवा मर्यादित संख्या नसेल.

– राज्यभरातील पोलिसांच्या प्रत्यक्ष कामगिरीचे अहवाल आणि प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या आधारे पदकांची घोषणा होणार.

– संपूर्ण निवड पद्धतीला आणि खर्चाच्या तरतुदीस मंत्रिमंडळाची मंजुरी

Vedh News