“मतदार याद्यांमध्ये घोळ करूनच सत्ता येतेय का?” ; अमोल कोल्हेंचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

नवी दिल्ली- ‘व्होट चोरी’च्या आरोपांवरून देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत रस्त्यावर उतरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘व्होट चोरी’बद्दल प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रातसुद्धा लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या दरम्यान जवळपास 60 लाख मते वाढतात, आता SIR मध्ये पण प्राथमिकदृष्ट्या महाराष्ट्रातली काही कोटी मतदारांची नावे कमी होतात, मग ही मते सोयीने वाढवली होती का, असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला आहे.
‘व्होट चोरी’च्या आरोप करत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांकडून त्यांना रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. याच आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. अमोल कोल्हे यांनी ‘व्होट चोरी’च्या आरोपांची तुलना घरातील चोरीशी केली. “आपल्या घरात चोरी झाली आणि चोर कोण आहे हे माहीत असेल, तर त्याच्यावर कारवाई व्हावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, इथे लोकशाहीत बहुमूल्य असलेलं मत चोरीला जात आहे,” असं ते म्हणाले. मतदार याद्यांमध्ये फेरफार होत असल्याचा आरोप करत त्यांनी या सगळ्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचा संदर्भ देत कोल्हे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. न्यायालयाकडून कडक ताशेरे ओढल्यानंतरही जर संबंधित प्रकरणात कारवाई होत नसेल किंवा मुख्य निवडणूक आयुक्त स्वतःहून पदाचा राजीनामा देत नसतील, तर ही बाब ‘निर्ढावलेपणा’ असल्याचं म्हणावं लागेल, असा घणाघात त्यांनी केला. “मतदार याद्यांमध्ये घोळ करूनच मग ही सत्ता येतेय का?” असा थेट सवाल त्यांनी केला. तसंच या प्रकरणावर कारवाईची मागणी करताना मुख्य निवडणूक आयुक्तांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतांच्या संख्येत झालेल्या कथित वाढीचा मुद्दा उपस्थित केला. “जी मतं वाढली होती, तीच SIRमध्ये कमी झालेली आहेत का? ही मतं सोयीने वाढवली होती का?” असा सवाल करत या आकडेवारीचं स्पष्टीकरण जनतेसमोर स्पष्टपणे मांडण्याची मागणी त्यांनी केली.






