पिंपरी – पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू ठेवली आहे. चालू वर्ष २०२६ मध्ये आतापर्यंत तब्बल ५ लाख ७२ हजार १८ कारवायांमधून ६३ कोटी ७८ लाख ४७ हजार ६५० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
वाहतूक नियमभंगाच्या या कारवाईत विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या ७२ हजार १२३ वाहनचालकांवर, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या ५३ हजार ८४० वाहनांवर, काळ्या काचा वापरणाऱ्या २७ हजार ५९७ वाहनांवर आणि मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या १० हजार २०३ वाहनांवर विशेष कारवाई करण्यात आली आहे. मागील आठवड्यात विधानसभा सदस्य, आमदार तसेच अशोकस्तंभाचा लोगो अनधिकृतपणे वापरणाऱ्या वाहनमालक आणि चालकांविरोधातही भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनांचे परवाने निलंबित करण्याबाबतचे प्रस्ताव नियमानुसार पाठविण्यात येणार आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेकडून ही कारवाई करण्यात येत आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून दंडात्मक तसेच न्यायालयीन कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी, वाहतूक नियमन आणि इतर वाहतूकविषयक समस्या पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ‘ट्रॅफिक बडी’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट क्रमांक ८७८८६४९८८५ याचा जास्तीत जास्त वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
