ब्रेकिंग न्यूज

वाय सी एम रुग्णालयाच्या आवारात वाजवला ढोल ताशा ; दोन महिला डॉक्टरांसह सहा जणांविरूद्ध गुन्हा

Share

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) आवारात गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी ढाेल-ताशा वाजविणाऱ्या १३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे आणि अतिरिक्त आराेग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. अभयचंद्र दादेवार यांनी नोटीस देऊन तत्काळ खुलासा मागविला आहे. दरम्यान, शांतता झोन परिसरात विनापरवाना वाद्य वाजविल्याने पोलिसांनी स्वतःहून दखल घेत दोन महिला डॉक्टरांसह सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वायसीएम रुग्णालयात गणेशाेत्सवानिमित्त कर्मचारी महासंघासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली हाेती. नवव्या दिवशी या गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत रुग्णालयाच्या आवारातच ढाेल-ताशे वाजविण्यात आले. त्या वेळी वरिष्ठ अधिकारी हे महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी महापालिका मुख्यालयात आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित होते. रुग्णालय परिसरातील ढोल-ताशा वादनाची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. याबाबत महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केल्या. रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशे किंवा इतर वाद्ये वाजवणे योग्य आहे का, असा सवाल तक्रारदारांनी केला. तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली.

या घटनेची आयुक्त सूर्यवंशी यांनी गंभीर दखल घेत वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. वाबळे आणि अतिरिक्त आराेग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. दादेवार यांना संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानुसार डाॅ. वाबळे आणि डाॅ. दादेवार यांनी गणेशाेत्सव आयाेजनातील प्रमुख १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नाेटीस देऊन तत्काळ खुलासा मागविला आहे. कर्मचाऱ्यांच्या खुलाशानंतर पुढील प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे डाॅ. दादेवार यांनी सांगितले.