पुणे- आंबेगाव पठार पोलीस चौकीत आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवून मारहाण केल्याच्या आरोपांप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील ११ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या फॅक्ट फाइंडिंग रिपोर्टनंतर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी ४ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी आंबेगाव पठार चौकीत आणले होते. तर, २१ जुलै रोजी पुन्हा ४ जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे, एकूण ८ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवून बेल्टने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुलांना बाल कल्याण समितीसमोर हजर न करता बेकायदेशीरपणे पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. येथे बालकल्याण पोलीस अधिकारी नसताना, सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात यांनी अहवाल लिहिला. त्यानुसार या मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची गंभीर दखल मानवी हक्क आयोगाने ‘सुओ मोटो’ दखल घेतली होती. आयोगाच्या आदेशानंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) संकेत सतीश गोसावी यांच्या तक्रारीवरून आज २४ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा (FIR No. 0483/2026) नोंदवण्यात आला आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलीस निरीक्षक निलेश मोकाशी यांच्यासह पोलीस हवालदार सुनील हनवटे, दिनेश टापके, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरसे, सोहम रोडेकर, मंगेश पवार, महिला पोलीस अंमलदार स्वप्ना भिसे अशी या ११ पोलीस अधिकारी आणि अमलदारांची नावे आहेत.
राज्य मानवाधिकार आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना पुण्याचे पोलीस आयुक्तांसह तेरा पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देत स्थगिती मिळवली. त्यामुळे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांना वगळुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अकरा पोलीसांवर सी आय डी कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित पोलिसांवर भारतीय न्याय संहिता, बाल न्याय कायदा २०१५ (कलम ७४, ७५ – क्रूर वागणूक देणे व ओळख उघड करणे) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद करत आहेत. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
