दरोड्याच्या तयारीत असलेले दोघे आले पोलिसांच्या नजरेत आणि झाला सहा गुन्ह्यांचा उलगडा

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात भक्ती शक्ती चौकातील बस स्टॉपवर दोन जण संशयस्पदरित्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली आणि सहा गुन्ह्यांचा उलगडा पोलिसांना झाला.
विकास मिलिंद कांबळे (वय ३५ रा. पिंपरी ), गौतम धर्मलिंगम नाडार (वय २८ रा. राजगुरूनगर ) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडील जप्त करण्यात आलेल्या बॅगेत स्क्रू ड्रायव्हर, छिन्नी, आणि करवत अशी हत्यारे आढळून आली.
पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये केलेल्या सहा गुन्ह्यांचा तपास लागला. पोलिसांच्या माहितीनुसार काळेवाडी, मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक घरफोडी, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक आणि संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दुचाकी चोरीचे गुन्हे अशा सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून ३ लाख २५ रुपये किमतीच्या दुचाक्या आणि चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीना काळेवाडी पोलिसांकडे सुपूर्द केले असून पुढील तपास सुरु आहे.






