बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय दाखले तयार करुन घेतला शासकीय योजनांचा लाभ, एकावर गुन्हा दाखल

पुणे – ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला तयार करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे शिधापत्रिका, जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करुन शासकीय योजनांचा लाभ घेतल्याच्या आरोपातून एकावर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या पोलीस उपअधीक्षक सई भोरे पाटील यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ज्ञानेश्वर बबन शेळके (रा. महाळुंगे, ता़ मुळशी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील कोलतावडे ग्रामपंचायत सरंपच व विठ्ठल मारुती शेळके यांनी ज्ञानेश्वर बबन शेळके यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज केला होता. त्यात ज्ञानेश्वर बबन शेळके हे कोलतावडे येथील रहिवासी नसून त्यांनी विठ्ठल मारुती शेळके यांच्या कुटुंबातील पुरावे जोडून बोगस जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन सरकारी सेवेचा लाभ घेत आहे, अशी तक्रार केली होती. याची सत्यता पडताळणी करण्याकरीता समितीने हे प्रकरण २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस दक्षता पथकाकडे हस्तांतरीत केले होते.
चौकशीत ज्ञानेश्वर बबन शेळके यांनी कोलतावडे येथील ८ अ उतारा बनावट तयार केला. तसेच बनावट शिक्क्यांचा वापर करुन रहिवासी दाखले तयार केले. त्याचा वापर करुन शिधापत्रिका, जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले. त्यानंतर विठ्ठल मारुती शेळके यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या शालेय व महसूल नोंदी वापरुन ५ मार्च २०१६ रोजी अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती येथे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले असल्याचे दिसून आले.
याबाबतचा सविस्तर अहवाल १९ जून २०२६ रोजी समितीस सादर केला. त्यानंतर समितीने सुनावणी घेऊन २२ सप्टेंबर २०२६ रोजी निर्णय दिला. त्यामध्ये ज्ञानेश्वर बबर शेळके यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कोळी महादेव अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याचे सिद्ध झाले.
पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करीत आहेत.






