संजय राऊत यांच्या आरोपावर तुकाराम मुंढे म्हणाले..’ठोस पुरावे द्या….’

संजय राऊत यांच्या आरोपावर तुकाराम मुंढे म्हणाले..’ठोस पुरावे द्या….’
Share

मुंबई – शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते संजय राऊत यांनी अन्न सुरक्षा नियामकाच्या अधिकाऱ्यांवर खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवले होते. या आरोपाला उत्तर देताना तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे की, असे कोणतेही पत्र अद्याप मला मिळालेले नाही. पत्र पाठवल्याचे मला प्रसार माध्यमाकडून समजले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

अन्न सुरक्षा अधिकारी हे हॉटेल व्यावसायिक, रेस्टॉरंट्स आणि क्विक कॉमर्स कंपन्यांकडून खंडणी उकळत असल्याचे आरोप सर्वसाधारण स्वरूपाचे असून त्यात कोणताही ठोस तपशील नाही. संजय राऊत यांच्याकडे जर काही ठोस पुरावे किंवा माहिती असेल, तर त्यांनी ती आपल्याकडे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) द्यावीत असेही मुंढे यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी पत्रात काय लिहिले आहे? 

संजय राऊत यांनी तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून, “हॉटेल व्यावसायिकांना धमकावून आणि ब्लॅकमेल करून पैसे गोळा करण्याचा हा उद्योग आता पूर्वीपेक्षा अधिक जोमाने सुरू झाला आहे”, असा आरोप केला होता. पत्रात पुढे म्हटलं होतं की, “एफडीएचे नियुक्त अधिकारी, सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकारी त्यांचे परवाने निलंबित करण्याची धमकी देऊन हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्विक कॉमर्स व्यावसायिकांकडून उघडपणे मोठी रक्कम गोळा करत आहेत. असं सांगितलं जात आहे की, मुंडे एफडीए आयुक्त होण्यापूर्वी नोटीस बंद करण्याचा दर १० हजार ते १२ हजार रुपये होता. मुंडे यांनी दहशत निर्माण केल्यानंतर हाच दर ७५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत वाढला आहे”

दरम्यान, ज्या व्यावसायिकांना त्रास दिला गेला आहे किंवा पैसे मागितले आहेत, त्यांनी न घाबरता पुढे यावे. तक्रारदाराची आणि त्यांची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी खात्री मुंढे यांनी दिली आहे.

Vedh News