‘पोलीस आयुक्तांनी समज द्यावी….’ ; हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा विद्यानंद बापट यांना इशारा

पुणे- डीजेबाबत आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीनंतर ‘शेण खाऊन माजलेले आणि गोमूत्र पिऊन माजलेले देवभोळे, धर्मभोळे उत्सवखोर..’ अशा तीव्र शब्दात टीका केली आहे. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विद्यानंद बापट यांना इशारा दिला आहे.
हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी म्हटले आहे की विद्यानंद बापट यांना ध्वनी प्रदूषण या विषयावर नागरिकांचा पाठींबा व प्रसिद्धी मिळाली, परंतु ते गणेश भक्तांवर चिथावणीखोर वक्तव्य करीत आहेत. विद्यानंद बापट यांना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी समज द्यावी असे दामगुडे यांनी म्हटले आहे.
‘लाखांच्या घरात संख्या असलेल्या गणेश मंडळ कार्यकर्त्यांविषयी गैर भाषा वापरून चिथावणी देत असल्याने पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी विद्यानंद बापट यांना समज द्यावी…’, अशी मागणी दामगुडे यांनी केली आहे. दामगुडे यांच्याबरोबरच अनेक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विद्यानंद बापट यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.






