महत्वाची बातमी : पुणे महापालिकेतील नोकरभरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार राजेंद्र खेडेकरला अटक

पुणे- पुणे महापालिकेतील बहुचर्चित बनावट नोकरभरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार राजेंद्र खेडेकरला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शेकडो युवकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील, नमिता बनसोडे यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल आहेत. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील अधीक्षकांनी याबाबत तक्रार दिली आहे. मे २०२२ ते मे २०२५ या कालावधीत महापालिका परिसरासह अन्य ठिकाणी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना पुणे महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून खेडेकर याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. त्यासाठी महापालिकेचे बनावट लेटरहेड, खोटे शिक्के आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे, सेवापुस्तिका आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे तयार करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींनी १४ हून अधिक उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्याकडून जवळपास पावणेतीन कोटी रुपये उकळल्याचे तपासात समोर आले आहे.
उमेदवारांना खरी नोकरी लागल्याचा भास व्हावा म्हणून त्यांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याचेही भासविण्यात आले. प्राथमिक तपासात १४ हून अधिक उमेदवारांकडून पावणेतीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचा दावा समोर आला आहे,
राजेंद्र खेडेकर हा जेजुरी येथील श्री मार्तंड देवसंस्थानचा विश्वस्त आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये पुणे सत्र न्यायालयाने राजेंद्र खेडेकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता, त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते आणि अखेर मंगळवारी (२९ सप्टेंबर) त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.






