पुण्यात तृतीयपंथीयावर धर्मांतरासाठी दबाव आणून मारहाण ; साडेसहा लाख रुपये लुटले, ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात तृतीयपंथीयावर धर्मांतरासाठी दबाव आणून मारहाण ; साडेसहा लाख रुपये लुटले, ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share

पुणे- तृतीयपंथीयावर कथितपणे धर्मांतरासाठी दबाव आणून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच घरातील साडेसहा लाखांची रोकड लुटल्याचेही समोर आले आहे. ही घटना कोथरूड भागात घडली. या प्रकरणी नऊ तृतीयपंथीयाच्या विरोधात दरोडा, धमकावणे, धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६ मधील कलमे तसेच अन्य कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३० वर्षीय तृतीयपंथीय कोथरूड भागात एका मंदिराजवळ राहायला आहे. २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास ९ आरोपी फिर्यादीच्या घरात घुसून त्यांनी त्याच्या धर्माविषयी अपमानास्पद बोलून त्याच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला. तसेच पट्ट्याने आणि बांबूने मारहाण केली.

भिक्षेतील ५० टक्के वाटा न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच घरातील ६ लाख ७० हजार रुपयांची रोकड लुटली असे दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम पुढील तपास करत आहेत.

Vedh News