पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

पिंपरी- पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना उल्लेखनीय प्रशासकीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) मुंबईतील लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये आयोजित पदक अलंकरण समारंभात त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले.
विनय कुमार चौबे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय कार्याची, कर्तव्यनिष्ठेची आणि सेवाभावी वृत्तीची पावती मानला जात आहे. त्यांच्या या गौरवामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीही ही अभिमानाची बाब ठरली आहे.
विनय कुमार चौबे यांनी डिसेंबर २०२२ मध्ये पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. तत्पूर्वी ते लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. चौबे हे पिंपरी चिंचवडचे पाचवे आयुक्त आहेत.






