पुण्याच्या रोहित राणेला फ्रान्समध्ये २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ; काय आहे प्रकरण?

पुण्याच्या रोहित राणेला फ्रान्समध्ये २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ; काय आहे प्रकरण?
Share

पॅरिस- सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिमुकल्यांचे शोषण करणारी एक मोठी टोळी फ्रान्समध्ये उघडकीस आणण्यात आली आहे. CLTV नावाचे एक विकृत ऑनलाईन नेटवर्क चालवणाऱ्या आणि त्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या पुण्यातील रोहित राणे याला पॅरिस येथील न्यायालयाने २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

२९ वर्षीय रोहित राणे याच्यावर ब्रिटन, अमेरिका, न्यूझीलंड मधील मुलींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून विकृत कृत्य करून घेणे, त्यांचा शारीरिक, मानसिक छळ करणे असा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता. रोहित राणे हा या आंतरराष्ट्रीय टोळीचा मुख्य सूत्रधार होता. या टोळीने अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी डिसकॉर्ड या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर केला होता. मुलींना मानसिकदृष्ट्या ताब्यात घेऊन त्यांना गुलाम बनवले जात होते. बालकांचे लैंगिक शोषण करणे, खंडणी उकळणे आणि अल्पवयीन मुलांवर अन्वनित अत्याचार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. या गुन्ह्यांमध्ये ओळख पटलेल्या सुमारे २० पीडित मुलींपैकी बहुतांश अमेरिकन होत्या. या ग्रुपमध्ये अमेरिका, भारत, जर्मनी आणि न्यूझीलंडमधील काही तरुण मुलेही सामील होती.

रोहित राणे याचा जन्म पुण्याचा असून फ्रान्समधील अँटिब्स शहरात एका व्यावसायिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. त्यानंतर तिथेच एक क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करू लागला. २०२०-२१ दरम्यान अमेरिकन तपास यंत्रणांनी फ्रान्सच्या पोलिसांना रोहित राणेंच्या ऑनलाईन संशयास्पद हालचालींच्या बाबत सावध केले होते. त्यांच्या सूचनेवरून फ्रान्स पोलिसांनी अँटिब्स येथून २०२१ मध्ये रोहित राणेला अटक केली होती. सुरुवातीला त्याने सर्व आरोपांचे खंडन केले. परंतु तो डिसकॉर्ड या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा ऍडमिन असल्याचे आणि त्याला हिंसक व्हिडिओ पाहण्याची सवय असल्याचे त्याने पोलिसांसमोर कबुल केले.

पॅरिसच्या न्यायालयाने त्याला संघटित गुन्हेगारीद्वारे खंडणी, तसेच अमानुष छळ आणि शोषणाच्या गुन्ह्यांत दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी पक्षाने त्याला ३० वर्षांच्या शिक्षेची मागणी केली होती, पण न्यायालयाने त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावली.

Vedh News