दिवेघाट आज वाहतुकीसाठी दोन तास बंद राहणार

दिवेघाट आज वाहतुकीसाठी दोन तास बंद राहणार
Share

पुणे – हडपसर ते दिवेघाट दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी दिवेघाट परिसरात बुधवारी (ता. ३०) ‘ब्लास्टिंग’ (दगड फोडण्यासाठीचा स्फोट) करण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून दुपारी १२ ते दुपारी दोन वाजेपर्यंत दिवेघाटातील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या सूचनेनुसार, रस्ता रुंदीकरणासाठी घाटातील कडे कापण्याचे काम सुरू असून त्यासाठी हा ब्लास्टिंगचा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी दोन तास हा मार्ग बंद राहणार असल्याने या कालावधीत प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी दिवेघाटाऐवजी इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागरिकांनी या तात्पुरत्या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त आणि महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी दोन वाजल्यानंतर या मार्गावरील वाहतूक नेहमीप्रमाणे पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.

Vedh News