एक महिन्याच्या तांत्रिक विश्लेषणानंतर अल्पवयीन मुलाला मारहाण करणारा पोलीस सापडला

पुणे- दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात साचलेले पाणी अंगावर उडाल्याच्या किरकोळ कारणावरून अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण करणारा पोलीस कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला नोटीस बजावली असून, लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वसंत जगताप असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
याबाबतची माहिती अशी की, लोहगाव परिसरात राहणारा १७ वर्षीय विद्यार्थी २६ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास मित्रांना भेटून मोझे नगर येथून डी. वाय. पाटील रस्त्याने मोपेडवरून घरी जात होता. पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून त्यामध्ये पाणी साचले होते.
डी. वाय. पाटील चौकातील पुणेरी बिर्याणी हॉटेलसमोरून जात असताना मोपेडच्या चाकांमुळे उडालेले पाणी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार वसंत जगताप यांच्या अंगावर उडाले.
पाणी अंगावर उडाल्याने संतप्त झालेल्या जगताप यांनी विद्यार्थ्याचा दुचाकीवरून पाठलाग केला. राजरत्न हॉटेलसमोर त्याची दुचाकी अडवून शिवीगाळ करत कानशिलात लगावली तसेच तोंडावर बुक्क्याने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मारहाण केल्यानंतर आरोपी तेथून निघून गेला.
घरी पोहोचल्यानंतर विद्यार्थ्याने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर रात्री उशिरा लोहगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या दुचाकीच्या मागील बाजूस पोलिसांचा लोगो असल्याचे विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले होते.
या माहितीच्या आधारे लोहगाव पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. जवळपास महिनाभर विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविली. तो चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी त्याला नोटीस बजावली असून, लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी दिली.






