विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून स्वच्छतागृहात बंद करून ठेवले, शिक्षिकेसह व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा

घोरपडी – शाळेत विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्याची मानसिक स्थिती याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र शिक्षा करण्याच्या नादात या गोष्टीकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होते. असाच प्रकार पुण्याच्या घोरपडी येथील एका शाळेत घडला आहे. पूर्वप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून स्वच्छतागृहात बंद करून ठेवल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी घोरपडी येथील एका शाळेतील शिक्षिकेसह व्यवस्थापिकेविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बी. टी. कवडे रस्ता येथील एका पूर्वप्राथमिक शाळेत आठ ऑक्टोबर रोजी घडली. विद्यार्थ्याला शाळेतील स्वच्छतागृहात बंद करून ठेवल्याचा आरोप त्याच्या पालकांनी फिर्यादीमध्ये केला आहे.
या प्रकरणी शाळेतील शिक्षिका आणि व्यवस्थापिका यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम, २०१५ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी करून मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.






