पुणे जिल्ह्यातील सोनसाखळी चोरीच्या सहा गुन्ह्याचा छडा, दोघांना अटक ; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे जिल्ह्यातील सोनसाखळी चोरीच्या सहा गुन्ह्याचा छडा, दोघांना अटक ; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
Share

दौंड – पुणे जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. त्यांच्याकडून ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यांत वापरलेली दुचाकी, असा एकूण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दीपक बलभीम पवार (वय २८, रा. आरोळे वस्ती, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि युवराज सचिन लोखंडे (वय २४, रा. उद्धट, ता. इंदापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पुणे जिल्ह्यात २६ जुलै ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सोनसाखळी चोरीच्या सहा घटना घडल्या होत्या. दुचाकीवरून येत पायी जाणाऱ्या किंवा दुचाकीस्वार महिलांना लक्ष्य करून सोनसाखळी पाळण्याची त्यांची गुन्ह्याची पद्धत आहे. चोरीच्या पद्धतीतील साम्य आणि दुचाकीवरील तरुणांचा सहभाग लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे दीपक पवार आणि युवराज लोखंडे यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. दोघांना जामखेड मधील आरोळे वस्ती येथून ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलातील दौंड, यवत, वडगाव निंबाळकर आणि जेजुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सहा चोऱ्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक गणेश बिरादार, उप अधीक्षक बापूराव दडस यांनी तपासाची दिशा ठरविली. तपास पथकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंडचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राऊत व शंकर वाघमारे, अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शोख, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, राजू मोमीन, विकास कापरे, भारत मोहोळ, चेतन पाटील, तसेच दौंड पोलीस ठाण्याचे अंतुल पठाण आणि अंकुश दळवी यांचा समावेश होता.

Vedh News