मालमत्तेच्या वादातून आजीचा खून ; नातू पोलीस ठाण्यात हजर, नवी सांगवीमधील घटना

मालमत्तेच्या वादातून आजीचा खून ; नातू पोलीस ठाण्यात हजर, नवी सांगवीमधील घटना
Share

पुणे – लोणावळ्यात संपत्तीच्या वाट्यावरून आजोबाने नातवाची गोळी मारून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता नातवाने संपत्तीमधील हिस्शावरून आपल्या सावत्र आजीला संपवल्याची थरारक घटना घडली आहे. आजीचा जीव घेऊन नातू थेट पोलीस ठाण्यात हजर झाला आणि खुनाची कबुली दिली. शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सांगवीतील क्रांती चौक येथे ही घटना घडली.

ओंकार किसान शिंगोरे (वय २६, रा. पिंपळे गुरव) असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तर, मंगल बाबूराव शिंगोरे (वय ६०, रा. क्रांती चौक, नवी सांगवी) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी मंगल यांची मुलगी संगीता चटपल्लीवार (रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.

ओंकार हा मंगल यांच्या सावत्र मुलाचा मुलगा आहे. ओंकार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मंगल यांच्या मालकीची नवी सांगवी येथे राहती इमारत आहे. या मालमत्तेमध्ये ओंकारला वाटा हवा होता. मंगल तो देण्यास तयार नव्हत्या.

शुक्रवारी सकाळी मंगल घरात असताना ओंकार तिथे आला. त्यांच्यात मालमत्तेवरून वाद झाला. त्या रागातून ओंकार याने चाकूने मंगल यांच्या गळ्यावर वार केले. यामध्ये मंगल यांचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर ओंकार स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.

पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता मंगला या स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांना लगेचच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेची खातरजमा करून ओंकारला ताब्यात घेतले. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

 

 

Vedh News