२२ लाखांची लाच मागणाऱ्या उत्पादन शुल्क निरीक्षकाला पुण्यात रंगेहाथ अटक

२२ लाखांची लाच मागणाऱ्या उत्पादन शुल्क निरीक्षकाला पुण्यात रंगेहाथ अटक
Share

पुणे- मद्यविक्री परवाना नूतनीकरणासाठी २२ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या उत्पादन शुल्क विभागातील एका वरिष्ठ निरीक्षकाला ACB च्या पथकाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

जितेंद्र हरिश्चंद्र पाटील असे लाच स्वीकारणाऱ्या वरिष्ठ उत्पादन शुल्क अधिकाऱ्याचे नाव आहे.

पुण्यातील एका मद्यविक्री दुकानाच्या परवान्याचे नूतनीकरण रखडले होते. यासाठी दुकानदाराने उत्पादन शुल्क कार्यालयात अर्ज केला होता. मात्र फाईल पुढे नेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने २२ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या दुकानाचा वार्षिक परवाना नूतनीकरण करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकाने २२ लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडी नंतर १२ लाख लाच देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने थेट पुणे ACB कडे तक्रार दाखल केली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर ACB ने सकाळी ठरल्याप्रमाणे तक्रारदार पैसे घेऊन संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात पोहोचला. १२ लाखांची लाचेची रक्कम स्वीकारताच ACB च्या अधिकाऱ्यांनी झडप घालून त्या निरीक्षकाला ताब्यात घेतले.

लाचेचे पैसेही पंचांसमोर जप्त करण्यात आले. यानंतर आरोपी अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या लाच प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का, याचाही तपास ACB करत आहे. आरोपीच्या कार्यालय आणि घराची झडतीही घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Vedh News