पिंपरी – थेरगाव परिसरात पहाटेच्या वेळी एक थरारक घटना घडली आहे. रुग्णालयाबाहेर उभ्या केलेल्या कारच्या काचा फोडणाऱ्या टोळक्याला रोखणे व्यापाऱ्याला भलतंच महागात पडलं. या व्यापाऱ्याच्या गळ्याला कोयता लावून रोकड लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
नीरज हकीम सोळंके (वय २१) आणि सूरज हकीम सोळंके (वय १९) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव आनंदराव नळगिरे (वय २७, रा. थेरगाव) यांनी आपली कार थेरगाव येथील एका रुग्णालयाजवळ पार्क केली होती. सोमवारी (१० ऑगस्ट) पहाटे तीनच्या सुमारास संशयित आरोपींनी पेव्हर ब्लॉक, विटा आणि कोयत्याच्या साहाय्याने या कारच्या काचा फोडून मोठे नुकसान करण्यास सुरुवात केली. गाडीचा आवाज ऐकून कारमालक वैभव तात्काळ घटनास्थळी धावले आणि त्यांनी आरोपींना विरोध करण्याचा प्रयत्न केला.
वैभव यांनी अडवण्याचा प्रयत्न करताच आरोपी नीरज सोळंके याने हातात असलेला धारदार कोयता थेट वैभव यांच्या गळ्याला लावला आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच वेळी त्याचा साथीदार सूरज सोळंके याने वैभव यांच्या खिशात जबरदस्तीने हात घालून दीड हजार रुपयांची रोकड लुटली आणि दोघेही पसार झाले.
या अचानक झालेल्या हल्ल्याने हादरलेल्या वैभव नळगिरे यांनी तात्काळ वाकड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी नीरज सोळंके आणि सूरज सोळंके या दोघांविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, वाकड पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
