ब्रेकिंग न्यूज

नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा येत्या पंधरा दिवसांत

Share

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या भेटीनंतर गडकरी यांचे संबंधीत विभागाला तात्काळ निर्देश

पुणे : नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा येत्या पंधरा दिवसांत मार्गी लागणार असून त्यानंतर लागलीच हे काम सुरू होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना यासंबंधी तातडीने लक्ष घालून निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

खासदार डॉ. कोल्हे यांनी आज नवी दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्ते आणि दळणवळणाशी संबंधित विविध प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी नाशिक फाटा ते राजगुरुनगर या उन्नत मार्गाच्या कामाला गती देण्याची आपण विनंती केल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

या उन्नत रस्त्याच्या कामासाठी १०० टक्के जमीन अधिग्रहण झाल्याशिवाय प्रकल्प सुरू करता येणार नाही या कॅबिनेटच्या निर्णयामुळे प्रकल्पाला विलंब होत असल्याचे या चर्चेतून समोर आले. त्यावर आवश्यक असलेल्या १० हेक्टर जमिनीपैकी पीएमआरडीए क्षेत्रातील ६.९१ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध झाला असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ३.८१ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनासाठी पुढील १५ दिवसात निधी उपलब्ध होणार असल्याचे गडकरी यांनी या भेटीत सांगितले. त्याचबरोबर गडकरी यांनी स्वतः पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेत भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

मंचर आणि कळंब बायपास जवळ भुयारी मार्ग आणि सेवा रस्त्याची मागणी

मंचर आणि कळंब बायपास येथील अपघातप्रवण जागेवर लवकरात लवकर भुयारी मार्ग आणि सेवा रोड करण्यात यावा, अशी मागणीही डॉ. कोल्हे यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली. त्याबरोबरच एमएसआयडीसीकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या तळेगाव – चाकण – शिक्रापूर, हडपसर – यवत आणि पुणे-शिरूर या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठ्या मनस्ताप व आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होत असून या अपघातात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, ही बाबही डॉ. अमोल कोल्हे यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर गडकरी यांनी तातडीने एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांना रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या.