पिंपरी – सोशल मीडिया अर्थातच समाजमाध्यमाचा सकारात्मक उपयोग करून काकडे पार्क, चिंचवडगाव येथील ज्येष्ठ नागरिक रमेश कुलकर्णी आणि पुणेस्थित वैशाली क्षीरसागर यांनी दोन ते तीन महिन्यांच्या अथक परिश्रम, चिकाटी अन् अपूर्व उत्साहाच्या बळावर छत्रपती संभाजी विद्यालय, शिवनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील सन १९४६ ते १९६३ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन आपल्या शाळासोबत्यांचा व्हॉट्सॲप समूह तयार केला.
त्यानंतर सातत्यपूर्ण संपर्कातून पिंपरी – चिंचवड, पुणे, कराड आणि कोल्हापूर येथे स्थायिक झालेल्या या शालेय मित्रांच्या दोन दिवसीय स्नेहमेळावा सन २०२६ चे आयोजन निसर्ग छाया, भूगाव, पुणे येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये साठ ते त्र्याऐंशी या वयोगटातील सुमारे चाळीस विद्यार्थी पन्नास वर्षांनंतर प्रत्यक्ष एकमेकाला भेटले; आणि आपला प्रपंच अन् प्रापंचिक व्यापताप, शारीरिक व्याधी अन् वय विसरून शालेय आठवणींमध्ये रममाण झाले.
यावेळी व्हॉट्सॲप समूहप्रमुख रामदास सूर्यवंशी आणि अरुण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्नेहमेळाव्यात सर्वांना गुलाबपुष्प अन् पेढा देऊन गोड स्वागत करण्यात आले. वेलकम ड्रिंक्सचा आस्वाद घेताघेता शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळत गेला. दीपप्रज्वलन, गणेशवंदना, सरस्वतीपूजन आणि सुरेल स्वागतगीताने स्नेहमेळाव्याचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सहभागी झालेल्या प्रत्येकाने आपला परिचय, कौटुंबिक माहिती, सध्याचे वास्तव्य याविषयी माहिती दिली. स्वादिष्ट भोजन आणि विश्रांती घेऊन दुपारच्या सत्रात संगीत खुर्ची, संगीत नृत्य या खेळांमध्ये सर्वांनी हिरिरीने सहभाग घेतला. सायंकाळच्या सत्रात प्रश्नोत्तराच्या माध्यमातून योग व त्याचे महत्त्व याबाबत उपयुक्त माहिती देण्यात आली. मनोरंजक खेळांच्या सत्रात सर्वांनी खूप धमाल केली. त्यानंतर शालेय आठवणी, त्या काळातील गुरुजनांनी केलेले सुसंस्कार याविषयी भरभरून कृतज्ञतापूर्वक भावना व्यक्त केल्या. चित्तरंजन (दीपक) भिंताडे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. स्नेहमेळाव्यास उपस्थित राहिल्याबद्दल अध्यक्ष राजेंद्र नागेशकर व उपाध्यक्ष अनिल कदम यांच्या हस्ते संयोजक रमेश कुलकर्णी आणि वैशाली क्षीरसागर यांच्या वतीने प्रत्येक माजी विद्यार्थिनी व विद्यार्थ्याला स्नेहाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या. रात्रीच्या स्वादिष्ट भोजनानंतर अनिल कदम, श्रीकांत बिवलकर, विजय बिवलकर, भिंताडे, उज्ज्वला तारे, देवयानी पानसरे यांनी जुनी – नवी मराठी गीते ऐकवून आणि रामदास सूर्यवंशी, अधिकराव मोहिते व इतर विद्यार्थांनी विनोदी किस्से सांगून सर्वांचे मनोरंजन केले.
स्नेहमेळाव्याच्या समारोपप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांसमवेत आलेल्या जोडीदारांनी उत्स्फूर्त मनोगते व्यक्त करून उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला; तसेच पुन्हा भेटण्याचा मनोदय व्यक्त करीत एकमेकांचा निरोप घेतला.
