मुंबई- आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने 2023 साली त्यांना ‘पद्मभूषण’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.
सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी बांगलादेशातील भवानीपूर येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांनी संगीताचा अतिशय कसून आणि सखोल अभ्यास केला होता. सुमनजींचे माहेरचे आडनाव ‘हेमाडी’ असे होते. त्यामुळे लग्नापूर्वी त्या सिनेसृष्टीत ‘सुमन हेमाडी’ या नावानेच गाणी गात असत आणि याच नावाने त्यांची सुरुवातीची गाणी लोकप्रिय झाली. तलत महमूद यांनी सुमनताईंचा आवाज ऐकला. त्या आवाजाने प्रभावित होऊन तलत महमूद यांनी स्वतःच्या एका आगामी चित्रपटासाठी सुमनताईंना गाण्याची संधी दिली. तिथूनच त्यांचा चित्रपटसृष्टीतील यशस्वी प्रवास सुरू झाला.
सुमन कल्याणपूर यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही, तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. केंद्र सरकारने 2023 साली त्यांना ‘पद्मभूषण’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.
