भोसरी-वीस वर्षांपासून लायन्स क्लब भोजापूर गोल्डची सेवावर्षाची सुरवात समाजातील कर्तृत्ववान आणि सेवाभावी डॉक्टरांच्या सन्मानाने करण्यात येते. वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जपत आपल्या ज्ञान, अनुभव आणि सेवाभावातून गोरगरीब रुग्णांसाठी मोलाचे कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्याची परंपरा क्लबने अखंडपणे जपली आहे.
यावर्षी डॉक्टर्स डे निमित्त प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट डॉ. विजय सातव आणि नामवंत ऑर्थोडॉन्टिस्ट डॉ. विजय राहळकर या दोन्ही मान्यवर डॉक्टर/प्राध्यापकांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच विविध वैद्यकीय शाखांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणखी २० डॉक्टरांना मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लायन्सचे सेवा वर्ष २०२५-२६ चे प्रांतपाल लायन विजय आगरवाल तसेच अस्थिरोगतज्ज्ञ नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी लायन मुरलीधर साठे यांच्यासह क्लबचे पदाधिकारी, सदस्य तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
सन्मानाला उत्तर देताना डॉ. विजय राहळकर म्हणाले, “वैद्यकीय व्यवसाय आणि अध्यापन करताना अनेक तरुण डॉक्टर घडविण्याचे भाग्य मला लाभले. गुरु म्हणून आपल्या विद्यार्थ्याने आपल्यापेक्षा अधिक मोठे यश मिळवावे, हीच खरी गुरुदक्षिणा आहे. द्रोणाचार्याप्रमाणे आपल्या शिष्याच्या यशातच शिक्षकाचे खरे समाधान दडलेले असते. ही भावना मनात ठेवून मी आजही कार्यरत आहे.”
डॉ. विजय सातव यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “पॅथॉलॉजी हे वैद्यकीय क्षेत्रातील पडद्यामागे काम करणारे विभाग असले, तरी कोणत्याही आजाराचे अचूक निदान किंवा शस्त्रक्रियेचा निर्णय पॅथॉलॉजीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मला सातत्याने मिळाली असून, लायन्स क्लब भोजापूर गोल्डकडून झालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी आहे.”

यावेळी मा. प्रांतपाल लायन राजेश आगरवाल यांनी सांगितले की, सेवा वर्ष २०२५-२६ मध्ये लायन्स इंटरनॅशनलने जगभरातील ४२ कोटी नागरिकांपर्यंत विविध सेवा उपक्रम पोहोचवून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. लायन्स ही जगातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था असून मानवतेच्या सेवेसाठी तिचे कार्य अखंडपणे सुरू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लायन दिगंबर ढोकले यांनी केले.क्लबच्या नूतन अध्यक्षा डॉ. लायन सौम्या साबळे यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल क्लबच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. सेवा, संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्व या त्रिसूत्रीवर आधारित कार्य करून अधिकाधिक गरजूंपर्यंत लायन्सची सेवा पोहोचविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
डॉ. साबळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये डॉक्टर सन्मान सोहळा संपन्न झाला. . क्लबचे संस्थापक अध्यक्ष ला डॉ विलास साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि पसायदानाने सांगता झाली.
