ब्रेकिंग न्यूज

17 सप्टेंबरपासून भाजप राबवणार देशव्यापी ‘सेवा संकल्प अभियान’

Share

नवी दिल्ली – येत्या १७ सप्टेंबरपासून म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिनाभर देशव्यापी सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव पक्ष अभियानाच्या माध्यमातून केला जाणार आहे. अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली.

सेवेसाठी समर्पण मोदींच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पक्षाचे अभियान समर्पित सेवेभोवती केंद्रित असेल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. अभियानावेळी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजप युवक, महिला आणि शेतकऱ्यांसह समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचेल. देशातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी पक्षाकडून त्यांचा सन्मान केला जाईल.

भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने विशेष शिबिरांचे आयोजन केले जाईल. त्या शिबिरांमध्ये जनतेला केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशातून सहाय्य उपलब्ध होईल.