ब्रेकिंग न्यूज

भावडी गावची कन्या ऋतुजा मोरे पोलिस दलात दाखल

Share

पिंपरी – आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात असलेल्या भावडी गावातील ऋतुजा बारकु मोरे हिने महाराष्ट्र पोलिस दलात पुणे शहर पोलिस पदावर निवड मिळवत गावच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. भावडी गावातून पोलिस सेवेत दाखल होणारी ती पहिली महिला ठरली असून,तिच्या या यशामुळे सातगाव पठार परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही  कठोर मेहनत, आई तसेच कुटुंबीयांनी दिलेला पाठिंबा आणि प्रोत्साहन यामुळेच ती या टप्प्यापर्यंत पोहोचू शकली .ऋतुजाचे यश हे केवळ वैयक्तिक असून ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. तिच्या या कामगिरीमुळे भावडी गावाचे नाव उंचावले असून ,अनेक तरुण तरुणींना नव्या ध्येयाची दिशा मिळाली आहे.

ऋतुजा हिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.भावडी ग्रामस्थ आणि मोरे परिवार यांच्या वतीने ऋतुजाची भव्य मिरवणूक तसेच सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.