बारामती – आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. या प्रकरणाच्या तपासाची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार आणि बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी उपस्थित होते.
२२ ऑगस्ट रोजी रात्री आई रागावली म्हणून रोहित पवार यांचे स्वीय सहायक दशावतारे यांची मुलगी घरातून निघून गेली होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला; मात्र ती आढळून न आल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सुरुवातीला तिचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त झाल्याने पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला होता.
तिचा मृतदेह घराजवळ आढळून आल्यानंतर तिचे हात पाय फ्रॅक्चर झाले असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास सुरु केला. या घटनेचा पूर्ण तपास केल्यानंतर या मुलीच्या बाबतीत कोणताही संशयास्पद प्रकार घडलेला नसून या मुलीने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
अशी घडली घटना
२२ ऑगस्ट रोजी रात्री आईने रागावल्यामुळे मुलगी घरातून निघून गेली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर
रुई येथील साईनगर परिसरातील पाच मजली इमारतीच्या गच्चीवर लिफ्टमधून रात्री ९. ५८ मिनिटांनी गेली. तिने जिन्याचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर रात्री १०. ०१ मिनिटांनी तिने गच्चीवरून खाली उडी घेऊन आत्महत्या केली. हा सर्व प्रकार सीसी टीव्ही फुटेज बघितल्यानंतर स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींचा तपास केल्यानंतर मुलगी शेजारील पाच मजली इमारतीवर गेली आणि तेथून उडी मारून तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.
