पिंपरी- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५०व्या जन्मवर्षाचे औचित्य साधून संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वतीने भक्तिरसपूर्ण ‘मोगरा फुलला’ या विशेष संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात हा भक्तिमय कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्य, अध्यात्म आणि भक्तिपरंपरेचा वेध घेणारे डॉ. गणेश शिंदे यांचे व्याख्यान होणार असून, प्रसिद्ध गायिका सौ. सन्मिता शिंदे यांच्या स्वरातून संत ज्ञानेश्वर माउलींच्या अभंग व ओव्यांचा भक्तिरस रसिकांना अनुभवता येणार आहे.
‘मोगरा फुलला’ हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे अभंग, ओवी, अध्यात्मिक विचार आणि भक्तिपरंपरा संगीताच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविणारा विशेष सांस्कृतिक उपक्रम आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतमय साहित्याचा, त्यांच्या अध्यात्मिक विचारांचा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा जागर या माध्यमातून करण्यात येणार आहे.
रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संदीप वाघेरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
