बनावट कागदपत्रांच्या आधारे पीएम आवास योजनेतील सदनिका लाटल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

पिंपरी – बनावट शैक्षणिक व इतर कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्राचा रहिवासी दाखला मिळवून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सदनिका मिळवल्याचा प्रकार भोसरी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपीला अटक केली आहे.
मोहम्मद दानिश अब्दुल माजिद शेख (वय ४५, रा. व्याघ्रगड सहकारी गृहनिर्माण संस्था, सेक्टर क्रमांक १२, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय महिला आणि इरफान शेख (रा. खराळवाडी, पुणे) या कथित एजंटाचाही आरोपींमध्ये समावेश आहे. हा प्रकार २१ मे २०२१ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. दहशतवादविरोधी शाखेतील पोलीस कर्मचारी अशोक शिवाजी भोगल यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीची पत्नी उत्तर प्रदेशातील रहिवासी असतानाही दोघांनी महाराष्ट्राच्या रहिवासी दाखल्याचा वापर करून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी असलेली सदनिका मिळविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मुख्य आरोपीचा जन्म उत्तर प्रदेशात झाला असतानाही त्याने पुण्यातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू ज्युनिअर कॉलेजमधून बारावीचे शिक्षण घेतल्याचा शाळा सोडल्याचा दाखला आणि त्याच्या वडिलांचा धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषद शाळेचा निर्गम उतारा अशी कागदपत्रे बनवून घेतल्याचा आरोप आहे.
ही कागदपत्रे कथित एजंटामार्फत तयार करून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे हवेली तहसील कार्यालयातून २०२१ मध्ये महाराष्ट्राचा रहिवासी दाखला मिळवला. त्यानंतर पीएमआरडीए, आकुर्डी यांच्या माध्यमातून भोसरीतील व्याघ्रगड सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बी/२० इमारतीतील सदनिका क्रमांक ९०४ स्वतःच्या नावावर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.






