पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ४ ची धडक कारवाई ; घरफोडी, वाहनचोरीच्या गुन्ह्यात पाच जण ताब्यात
पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने धडक कारवाई करत दोन सराईत चोरट्यांसह त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून दोन दुचाकींसह घरफोडी आणि वाहनचोरीचे एकूण ४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी ऋषिकेश राजेंद्र भोसले (वय २५ वर्षे, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) आणि
अशोक राजेंद्र भोसले (वय २५ वर्षे, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) व त्यांच्या इतर तीन साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोनHF-डिलक्स मोटरसायकली (क्र. MH 13 CA 8628 आणि MH 14 BW 3927) जप्त करण्यात आल्या.
आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले, तसेच चाकण आणि म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
कारवाईनंतर आरोपी ऋषिकेश भोसले व त्याच्या दोन साथीदारांना पुढील कारवाईसाठी उत्तर चाकण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तर आरोपी अशोक भोसले व त्याच्या साथीदाराची वैद्यकीय तपासणी करून त्यांना उत्तर म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-०१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सपोफौ लोणकर, मोरे, महाडीक, सोडगीर, असवले, सोनटक्के, बोराटे, मेरगळ, वेताळ, खेडकर, सुखदाने, मुंडे, नागरे, सोनवणे, बाळसराफ, खराडे व माटे यांच्या पथकाने केली.
