बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी लांबवली ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील दोन लाखांची सोनसाखळी

पुणे – पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केली. ही घटना विमाननगर परिसरात घडली.
याबाबत संबंधित ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाघोलीतील उबाळेनगर परिसरात राहतात. मंगळवारी (दि. 6) सायंकाळी सुमारे पाच वाजता ते विमाननगर ते वाघोली या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होते. त्यावेळी बसमध्ये मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली. काही वेळानंतर सोनसाखळी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुंड करीत आहेत.






