मुंबई- इंधनाच्या दरामध्ये वाढ, पॅकिंगच्या कच्च्यामालाच्या दरामध्ये वाढ तसेच साखरेचे भाव वाढल्यामुळे गे आणि म्हशीच्या पिशवीबंद दुधाच्या दारात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्यातील खासगी, सहकारी दूध संघानी घेतला आहे. ही दरवाढ येत्या मंगळवार (दि. ११) पासून लागू होणार आहे.
राज्यातील प्रमुख खासगी आणि सरकारी दूध संघांच्या सभासदांची बैठक आज, शुक्रवारी कात्रज डेअरी येथे झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के होते. या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.
मागील काही दिवसांमध्ये डिझेलच्या दरात प्रति लिटर १० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. आखाती युद्धामुळे पॅकिंगचा कच्चा माल महागला आहे, साखरेचा भाव देखील १२ रुपयांनी वाढला असल्यामुळे दुधाच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे दूध खरेदी दरामध्ये यापूर्वीच वाढ जाहली आहे. भविष्यकाळात दूध खरेदी दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर २ रुपये तर दुग्धजन्य पदार्थ दही, ताक, पनीर, लोणी आणि चीज यांसारखी उत्पादनाच्या दरामध्ये १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
