ब्रेकिंग न्यूज

बारामती हादरली ! पतीला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले, पण जिवंत पुरण्याचा प्रयत्न फसला

Share

बारामती- पतीला गुंगीचे औषध देऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना बारामती येथील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीत घडली आहे. या घटनेमुळे बारामती शहर हादरून गेले आहे.

प्रवीण जगताप ( वय ४१ रा. इंद्रप्रस्थ सोसायटी) असे या घटनेत वाचलेल्या पतीचे नाव असून शर्मिला जगताप (वय ३८) असे खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी प्रकाश कान्होबा जगताप (वय 71, रा. ढाकाळे, ता. बारामती) यांनी बारामती शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

अशी घडली घटना

बारामतीमधील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीत इंजिनिअर प्रविण जगताप यांना त्यांचीच पत्नी शर्मिला हिने गुंगीचे औषध देऊन अर्धबेशुद्ध केले आणि नंतर बॅटने मारहाण केली. त्यानंतर घराच्या गॅलरीत आधीच बांधून घेतलेल्या चौकोनी कट्ट्यात तिने पतीला डांबून त्यावर फरशी लावून जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला. कट्ट्यावर जड दगड ठेवण्यासाठी तिने मजुरांना बोलावले होते, परंतु आतून हालचाल जाणवल्याने मजुरांना संशय आला.

या घटनेची माहिती पोलिसाना ११२ हेल्पलाईनवर मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने प्रवीण जगताप यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पत्नीने आपल्या पतीला अशा प्रकारे घरातील गॅलरीतच जिवंत पुरण्याचा कट रचल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.