पुणे – कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्याच एका भरधाव व्हॅनने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांना अक्षरशः उडवून दिले. ३१ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास गर्दीने गजबजलेल्या सदाशिव पेठेत ही घटना घडली. या अपघातात तब्बल सात वाहनांना या व्हॅननं जोरदार धडक दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नेहमीप्रमाणे सदाशिव पेठ परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ होती. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका पोलीस व्हॅनवरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण अचानक सुटले. गाडीचा वेग इतका प्रचंड होता की, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेत सात वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये पोलीस व्हॅन अतिशय वेगाने येऊन वाहनांना धडकत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले. चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. हलगर्जीपणाबद्दल आणि बेजबाबदारपणे वाहन चालवल्याबद्दल संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
