पुणे- पोलीस लिहिलेल्या किंवा तशी पाटी लावलेल्या खासगी वाहनांवर लवकरच कारवाई करण्याचे संकेत आहेत. वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने या संदर्भात राज्यातील सर्व पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधीक्षकांना आदेश दिले आहेत.
‘पोलीस’ अशा नावाची लाल पाटी लावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या खासगी चारचाकी व दुचाकी वाहनातुन बरेचवेळा अवैध काम व दहशत निर्माण होण्याचा धोका असतो त्यामुळे अशा पाट्यांवर निर्बंध घातले जावेत अशा आशयाचे एक पत्र मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले आहे.
पोलीस अधिकारी आपल्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल रंगाची पाटी अथवा “पोलीस” लाल अक्षरात लिहून त्यांचे खासगी वाहन चालवित असतात. ‘पोलीस’ असे लिहिलेल्या गाडीची तपासणी होत नसल्यामुळे भाडेतत्वावर अवैध वस्तुंची ने-आण करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे सर्व पोलीस अधीक्षकांना आदेश देवून ‘पोलीस’ पाटी अथवा ‘पोलीस’ नाव दिसलेले वाहन आढळून आल्यास त्यांचेविरूध्द कलम १३३ (६) महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ सह कलम १७७ मोटार वाहन कायदा १९८८ अन्वये कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे.
आपल्या खासगी गाडीवर ‘पोलीस’ अशी पाटी लावून वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांवर देखील चांगला चाप बसणार आहे.
