पिंपरी- सिलेंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत एका हॉटेल कर्मचाऱ्याचा भाजून मृत्यू झाला. ही घटना वाकड-डांगे चौक रस्ता येथील ‘नवी दिल्ली बिर्याणी हाउस’मध्ये रविवारी रात्री घडली. या घटनेत अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.
शहजाद शेख (वय १९ रा. उत्तरप्रदेश ) असे या आगीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिलिंडर बदलताना गॅस गळती होऊन आग लागली. यामध्ये हॉटेलचे साहित्य जळून खाक झाले. आगीचे लोट शेजारच्या दुकानात शिरल्यामुळे या दुकानांचे देखील मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून आगीवर नियंत्रण मिळवले. हॉटेलमधून जखमी झालेल्या शहजाद शेख याला बाहेर काढून वाय सी एम रुग्णालयात दाखलकेले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाकड पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
